टिपरे returns episode 9शलाका डायरी

३ जुलै २०२०

सुशांतसिंगच्या प्रकरणात संजय लिला भन्साली यांची चौकशी होणार ही बातमी बघितली. या क्षेत्रात येणं किती त्रासदायक आहे? चांगला सिनेमा बनवून फायदा नाही. तो बनवताना कुणाला का नाही घेतलं? याची आठवणही ठेवायची. पण मराठीत असले प्रकार आहेत का? याविषयी सुध्दा चर्चा होवू लागली आहे. आमच्या काॅलेजात जे नाटक शिकवतात ते सांगत होते, म्हणजे हे आमच्या WhatsApp group वर कुणीतरी टाकलं की, मराठी क्षेत्रात nepotism नसलं तरी जात पात मराठी क्षेत्रात खुप पाहीली जाते. खास लोकांच्या कलाकृती पाहा. त्यानंतर येणारी नावं पाहा. कलाकार पासून तंत्रज्ञ यांची नावं वाचली की सगळ लक्षात येतं. प्रिती म्हणाली, या सरांना कुणी पुढे चान्स दिला नाही म्हणून हे असले विचार त्यांच्या डोक्यात येतात. मला आबा सांगतात... कलेला जात पात धर्म पंथ नसतो. सोनं कितीही दडवलं तरी लखलखायचं विसरत नाही. कोंबडं कितीही झाकलं तरी पहाटे आरवायचं राहात नाही. तुम्हाला कोणीही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी, टेलेंट असल्यावर त्याचा दिवस येणारच! सुर्यास्त झालावरच सुर्योदय होतो. हे विसरून चालायचं नाही.


आबांची डायरी

४ जुलै २०२०

उद्या गुरू पोर्णिमा. आज देसाई गुरूजींची फार आठवण येते. त्यांचं नाव आठवलं की, आठवतो तो त्यांचा मार!!! वेताची छडी. आंगठे पकडून ओणवे उभे राहाणे. अशा खुप शारीरीक कसरती त्यांनी करवून घेतल्या होत्या. तरीही कधी आम्ही गुरूंचा तिरस्कार किंवा त्यांचा राग मनात ठेवला नाही. त्यांनी जे केलं ते आमच्या भल्यासाठीच होतं. आज इतक्या वर्षांनंतर हे सगळं आठवतं आणि शिर नतमस्तक होतं. आजकालच्या पिढीला गुरूंचं महत्व काय समजणार? जे “गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णु” असं म्हणताता त्यांना काय महत्व समजावणार?

शिऱ्या शलाका ही दोघं सुध्दा आपल्या शाळेतल्या शिक्षकांविषयी “पकाऊ” हा शब्द वापरतात. कारण काय असावं? आम्ही संस्कार देण्यात कमी पडलो की, शिक्षक संस्कार करण्यात कमी पडले? शिक्षणाचा धंदा झाला आणि शिक्षण क्षेत्राचं गणित, भुगोल इतिहास जमा झाले. शाळेतल्या तासांचा कंटाळा ज्याक्षणी सुरू झाला तेव्हाच.. शिक्षक बोअर होण्याच्या गटात मोडू लागले. आजकाल म्हणे online शिक्षण सुरू आहे. आतातर या शिक्षण क्षेत्राची आणखी लक्तरं निघणार. परवा त्या नेनेंच्या नातवावर शिक्षक शिकवताना इतके चिडले की त्यांनी त्यांचा स्वत:चा laptop फोडला. त्यांना लक्षातच आलं नाही की, आपण online शिकवतोय. मुस्काटात मारायच्या नादात screenचे दोन तुकडे केले. उद्या गुरूपोर्णिमेला नेने कुटुंब त्यांना नवा laptop देणार आहेत. पुढच्या गुरूपोर्णिमेला गुरूदक्षीणा म्हणून शिक्षकांनी नातवाचा आंगठा मागू नये म्हणजे मिळवली.... त्याने पुढे laptop चालवायचा कसा ना????!!


शामला डायरी

५ जुलै २०२०

महिन्याचा खर्च भागवताना नाकी नऊ येतायत. प्रत्येक गोष्ट महागली आहे. या कोरोनाच्या संकटात घराबाहेर पडता येत नाही... काळजी एकच वाटत राहाते... भाजी आणायला जायचो. महाग वाटली तर ती न आणता... गर्दीतून येताना हा कोरोना घरी घेऊन यायचो. त्यात या वीज बिलाचा शाॅक. तक्रार करून झाली. Technically उत्तर दिलं म्हणे कंपनीने. बिल भरावच लागणार आहे. शिऱ्याचं म्हणणं आहे की, हे सगळं कंपनी जाणूनबूजून करतेय. त्यांनी PM Care फंडात काहीशे कोटी दिलेत. त्याची वसूली आपल्याकडून केली जातेय. आबा म्हणाले, हा निसर्गाचा नियम आहे. मोठे मासे नेहमी छोट्या मास्यांना खातात. त्यात आपण मुंबईचे बोंबिल... Bombay dock.. चविष्ट मासा. एकच काटा... बाकी सगळा बुळबुळीत!!! आबा एकएक काय सांगतील याचा नेम नाही. सोसायटीत पुन्हा एकजण positive सापडल्याची बातमी सोसायटी WhatsApp group वर आली. पुन्हा सगळीकडे चर्चा. एक मात्र खरं की, यापुढे या कोरोनावर लस सापडे पर्यंत आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागणार आहे. मी काळजी घ्यायला सुरूवात केलीय.. हे कामावर जातात. आबांना कुठेही जायची परवानगी नाही. शिऱ्या शलाकाला सांगितलय की, तंगडं मोडेन बाहेर पडलात तर... अशीच घेणार ना काळजी!!!!


शेखर डायरी

६ जुलै २०२०

शरदराव मातोश्रीवर गेल्याची बातमी पाहीली. राजकारणात समिकरणे किती पटापट बदलतात ना? आपण सामांन्य माणसांनी जे सुरू आहे ते शांतपणे पाहायचं. संजयरावांनी शरदरावांची मुलाखत घेतलीय म्हणे! काही महिन्यांपुर्वी एकमेकांच्या विराधात उभे ठाकलेले, एकमेकांना पाण्यात पाहाणारे अचानक सत्तेत एकत्र येतात. आणि त्याला नाव देण्यात येतं... लोकांच्या कल्याणासाठी आघाडी किंवा युती.

आणि आपण आपल्या नात्यातली भांडणं मरेपर्यंत टिकवतो. वर्षानुवर्ष तोंड पाहात नाही. आबांचे थोरले भाऊ देवाघरी जाईपर्यंत आमच्या घरी आले नाहीत. कारण काय झालं तर, एके दिवशी आबा त्यांना उलट बोलले होते. आणि ते केव्हा? जेव्हा आबा १५ आणि त्यांचे भाऊ २० वर्षांचे होते. तेव्हापासूनचा अबोला इतका काळ धरून ठेवला. असं या राजकारणात होत नाही. बेबनाव झाला तरी लगेच मिटिंग होऊन समेट घडतो. कुणालाच याक्षणी सत्ता सोडणे परवडणारं नाही. तीन चाकी रीक्षा चालायलाच हवी. नाहीतर कमळाबाई रीक्षामधील एकाला हायजॅक करून आपल्या दुचाकीवर आरूढ व्हायची. कधीपासून स्टार्टर मारून तयार आहे ती! या सगळ्यात कधी कुणी सामांन्य माणसांचा विचार केलाय का हो? आव आणला जातो. पण त्याच्या मुलभूत गरजा काय? त्याच्या अडचणी काय? राज्य आणि केंद्र सरकारच्या मधे त्याचं सॅंडविच झालय. आणि ते सॅंडविच दोघही मनापासून खातायत. कोरोनानंतरच जीवन माहीती नाही कसं असेल, मात्र यापुढे ज्याच्यात कोरोना आणि राजकारणाचा सामना करण्याची प्रतिकार शक्ती असेल तोच जगेल... बाकी तर किड्यामुंग्यांप्रमाणे मरतील.


शिऱ्याची डायरी

७ जुलै २०२०

आजचा दिवस आपण विसरूच शकत नाही. आपल्या धोनीचा birthday असतो ना... त्यात सरकारने जोरजोरत धक्के दिलेत. केंद्र सरकार म्हणतय परीक्षा होणार, राज्य सरकार म्हणतय परीक्षा होणार नाहीत! विद्यार्थी कुणाचं खरं मानणार? त्या विनयचा तर घोळ झालाय. परीक्षा रद्द म्हणून पोरांना पार्टी देऊन मोकळा झालाय. आता पुन्हा आभ्यासाला बसायचं तर पुस्तक घ्यावी लागणार. या वर्षाची पुस्तकं विकूनच पार्टी दिली होती ना!!!

१० हजार नवी पोलिस भर्ती होणार असं जाहीर केलय. बाबा म्हणाले शिऱ्या आता पोलिसातच भर्ती होतेय का बघ! क्रिकेटचं काही खरं नाही. ११ जणात बसणं अवघड असलं तरी, १० हजारात नक्की बसशील याची खात्री आहे. मलाही हरकत वाटत नाही. एकप्रकारे देश सेवाच करेन. त्यात आजकाल जरा पोलिसांना लोकं फार मानही देऊ लागलेत. संकट आल्याशिवाय आपल्याला पोलिसांचं, डाॅक्टर, नर्सेसच कधी महत्वच कळलच नव्हतं. आबा म्हणाले... सरकारचा पोलिस भर्तीचा निर्णय पक्का आहे का? याची खात्री करून मग स्वप्न रंगव. महाविकास आघाडीत नक्की कुणी निर्णय घेतलाय? आणि घेतलेला निर्णय नक्की कुणी बदललाय? ते पाहावं लागतय. त्यांची स्टेशनरी निर्णय घेण्यात आणि बदलण्यातच संपत असावी!!!


केदार शिंदे

७ जुलै २०२०

1,173 views

Recent Posts

See All