टिपरे returns episode 8आबांची डायरी

२७ जून २०२०

अर्ध वर्ष संपत आलं. पण चिंता काही संपत नाहीत. शेखर सांगत होता की, कोरोनाचे पेशंट

वाढतायत. डोक्याला ताप दिलाय या कोरोनाने. आधीच ३ महिने घरात कोंडून ठेवलं. आता जरा बाहेर पडू म्हटल्यावर हल्ला चढवतोय. आणि हे पिल्लू ज्याचं आहे तो चिन, त्याचसुध्दा काड्या घालणं सुरूच आहे. मोदींचं भाषण ऐकलं परवा tvवर. बोलतात अप्रतिम. समोरच्याला गुंतवून ठेवतात. पण मग हे त्या चिनवाल्याला झोपाळ्यावर बसवून तेच करत होते ना? गुंतलेला चिनी गोंडा सुटला कसा?

सर्जीकल स्ट्राईक कोणत्याही क्षणी होणार असं शिऱ्याचं मत आहे. शलाका म्हणाली की, कोणीतरी “उरी” सारखा सिनेमा लिहायलाही घेतला असेल. माझा अनुभव सांगतो की, असं काही होणार नाही. या पोरांपेक्षा कित्येक पावसाळे मी जास्त पाहीलेत. परराष्ट्र धोरण हे भावनेवर चालत नाही. त्याला डोकं लागतं. ते आजकाल कुणाला आहे की नाही? यावर आपल्या देशाचं भविष्य अवलंबून आहे.

रोजच्या रोज सरकारची बरोबर अथवा चुकीची बाजू दमदार मांडणारे काही प्रवक्ते आहेत. प्रवक्ते कसले, “पात्र” (पात्रा) म्हणावं त्यांना किंवा tvच्या चर्चेत आरडाओरडा करणारे काही news anchor आहेत... त्यांना सरकार सीमेवर का पाठवत नाही? त्यांच्या जाण्याने प्रश्न सुटेल की नाही माहीत नाही, आमच्या डोक्याला आणि कानांना आराम पडेल हे नक्की!!!


शेखर डायरी

२८ जून २०२०

धारावीमधले कोरोना आकडे घटले हे ऐकून फार बरं वाटलं. याची कारणं कुणी तपासली का? मला वाटतं नियमांचं काटेकोर पालन आणि स्वच्छता यामुळेच हे शक्य झालय. तिथे एका घरात माणसं कोंबलेली स्थीती. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरणार. त्या गोष्टी स्वच्छ ठेवल्याचा परीणाम दिसून आलाय. पण हे किती दिवस टिकेल? याचीच धास्ती वाटते.

आपल्या शिक्षण पध्दतीत घोळ आहे. वर्षानूवर्ष आपण पोरांना इतिहास भुगोलात अडकवणार. नागरीक शास्त्र २० मार्कांचं ठेवणार. पोरं सनावळी पाठ करून,नेमक्या महत्वाच्या गोष्टींकडे पाठ फिरवणार. टिपु सुल्तान कोणत्या साली मेला? या प्रश्नाचा उपयोग शाळेनंतर कधी कुणाला झालाय का? समाजात फिरतानाची शिस्त, आरोग्याची काळजी या गोष्टी ज्या नागरीक शास्त्रात येतात त्यांना आपण महत्व दिलं किती? आजही लोकांना मास्क घाला, हात धुवा, अंतर ठेवा याचं ज्ञान कितपत झालय? मी तर कित्येक लोकं बिनधास्त हे सगळ #ट्यावर मारून फिरताना बघतो. आता त्यावर दंड आकारून पुन्हा भ्रष्टाचाराला खतपाणीच घातलं जाणार ना? शिऱ्या आणि शलाका म्हणतात, तुम्ही चिडचिड करू नका. या देशाचं काही होणार नाही बाबा. हा देश कधीच बदलणार नाही. मुळात देश बदलण्याआधी आपण बदल आपल्यात घडवायला हवाय. “देश” सरकार नाही,तर आपण चालवतो ही कल्पना मनात रूजायला हवी. आबांनी या वाक्यावर टाळ्या वाजवल्या! म्हणाले, शेखर साहित्यीक झाला असतास, तर दोन चार पुस्तकं छापून त्या royalty वर या महिन्याचं वाढलेलं विज बील भरता आलं असतं. आबा लागलीच वास्तवाचं भान करून देण्यात पटाईत आहेत. अमिताभचा डायलाॅग आहे ना, “अपुनने एकही मारा लेकीन साॅलिड मारा ना”?


शिऱ्याची डायरी

३० जून २०२०

उद्यापासून unlock2 सुरू होणार. हे वाचून वाटतं की, गोलमाल-गोलमाल२-गोलमाल३-गोलमाल रिर्टन्स... असच काहीस आहे. एकदा सरकार हे सांगतं. नंतर पुन्हा काहीतरी वेगळं सांगतं. नेमकं त्यांचं म्हणणं समजत नाही. बाबांसारखं वागतय सरकार! “घरात काय बसलास? जरा नोकरीधंदा बघ”! आणि कधी एखाद दिवस उशीर झाला की,”कुठे हूंदडत असतोस रे? बाहेर गेलास तर तंगडं मोडेन”. तो हम करे तो करे क्या????!

आता २ कि मी पुढे प्रवास न करण्याचा नवा नियम काढलाय. अर्थ चक्र फिरायला हवं. त्यासाठी माणसालाही फिरायला हवं. घरात बसून तुम्ही काय देणार? चणे!!! तेही फक्त गरीबांच्या रेशन कार्डवर. आम्ही मध्यमवर्गीय म्हणजे क्रिकेट टिम मधल्या कुलदिप सिंग सारखे आहोत. टिममधे आहोत पण अकरा खेळाडूत entry ही नशीब असेल तरच! त्यातही त्या मॅचमधे समोरचा बॅटस्मॅन फोडफोड फोडणार. की पुन्हा १० मॅच पॅव्हेलियनमधे! पाणी द्यायला!!

अरे हम करे तो करे क्या???? आबा म्हणतात, शिऱ्या मी कधीपासून सांगतोय योग शिक. त्यामुळे मन शांत होत. आणि नशीब असेल तर रामदेवबाबा सारखं करीयर पण होतं.

त्याच्या कुंडलीत दोन योग होते. एक योग आणि दुसरा योगायोगाने बिझनेसमॅन होणे. ब्रम्हचारी बाबा मला दत्तक घेईल का? स्वप्न असायलाच हवीत मोठी!!!!


शलाका डायरी

१ जुलै २०२०

सात नवे सिनेमे डायरेक्ट OTT platform वर प्रदर्शीत करणार आहेत. म्हणजे थिएटर सुरू होणार नाही हे पक्क!! पण दुधावरची तहान किती दिवस ताकावर भागवायची? मोबाईलवर किंवा कंप्युटरवर सिनेमा पहाणे, म्हणजे तुषार कपूर हा सर्वोत्तम ॲक्टर समजण्यासारखं झालं. माझा तर सगळा मूडच गेलाय. माॅल बंद. कुठल्याही मैत्रिणीकडे जाता येत नाही. ग्रॅज्युएशन संपलय. काहीच जीवनात करण्यासारखं नाही. त्याच आज मोदी सरकारने डिजीटल सर्जीकल स्ट्राईक केला. Tiktok बंद केलय. मी कधीच त्या ॲपवर नव्हते. पण किती लोकांच्या tiktok मुळे मनोरंजन व्हायचं? तेही बंद केलं. माझ्यासारख्या मुलीने करायचं काय? आईला आज म्हणाले, बघ आई माझ्या आयुष्यात ना boyfriend , ना कोरोना? आईने असला धपाटा घातलाय!!!


शामला डायरी

२ जुलै २०२०

महागाई गगनाला भिडलीय की, गगन महागाई समोर नतमस्तक झालय? घरच्या गॅस पासून विज बीलापर्यंत.. आणि पेट्रोल डिझल पासून श्वास घेण्यापर्यंत.. सगळच कठीण झालय. आमच्या घरात हे एकटेच कमावणारे. कसे बसे आजपर्यंत दिवस ढकलले. यापुढे जगावं की मरावं हा एक सवाल पडलाय!

भावासारखे tv वर येऊन, उध्दव साहेब म्हणाले होते की खबरदारी तुम्ही घ्या जबाबदारी मी घेतो. आता मला त्यांना सांगायचय की, संसाराची जबाबदारी इतकी वर्ष मी घेतेय, आम्हाला खड्ड्यात घालणाऱ्या लोकांची खबरदारी तुम्ही का घेत नाही? ३ महिने शिस्त पाळली आम्ही. आता त्याचा चांगला परीणाम दिसायला हवा तर, दिसतय काय? नुसता कोरोना कोरोना करून उपयोग नाही. आम्हाला जगवण्यासाठीही कुच्छ करोना!!!!

मला यांच्या प्रकृतीची काळजी वाटायला लागलीय. मध्यरात्री अचानक परावा जाग आली तर, यांचे डोळे उघडे. छताकडे पहात कसला तरी विचार करत होते. मी चौकशी केली तर थातूरमातूर उत्तर दिल. २५ वर्ष झाली लग्नाला. डोळे मिटताच मनातलं ओळखणारी मी, सताड उघड्या डोळ्यातल्या विचारांचं मला कळणार नाही का?

मी त्यातल्या त्यात खर्च कमी करायचा ठरवलाय. पण दोन वेळेचं जेवण एकवेळ करता येणार नाही ना? आमची काळजी देवालाच!!! त्या देवाचीही काळजी वाटते.. ३ महिने त्याने माझं आणि मी त्याचं तोंड पाहीलं नाहीए.


केदार शिंदे

२ जुलै २०२०

446 views

Recent Posts

See All