टिपरे returns episode 6रोजच्या रोज episode पाहून येणारे तुमचे फोन, मेसेज, social media वर तुमच्या कौतुकाच्या post! आणखी काय पाहीजे असतं कलाकाराला? Zee marathi च्या regular मालिका जोवर सुरू होत नाहीत तोवर टिपरे सुरू ठेवतील, असं वाटतय. पण काय भरवसा? उद्या अचानक बंदही होईल. तोवर तुम्ही या कुटुंबाचा आनंद घ्या.

मालिका बंद झाली तरी, ही टिपरे डायरी बंद होणार नाही. तुम्हाला कंटाळा आला की सांगा. मग नक्कीच निरोप घेईन. तोवर बिनधास्त वाचा....


आबांची डायरी

१७ जून २०२०

नेनेंनी चिनचा बहिष्कार फारच मनावर घेतलाय. आज दुपारी झोपलो असताना धाडsss असा मोठ्याने आवाज झाला. दचकून उठलो. विचारलं कोण पडलं? शिऱ्या म्हणाला... नेने!!! अरे देवा ७५ वर्षात पडणे म्हणजे स्वत:चं स्वर्ग टिकीट काढणेच! बाहेर येऊन पाहतो तर, नेनेंचा tv पडलेला दिसला. नवा कोरा ३२ इंची tv चौथ्या माळ्यावरून धारातिर्थी पडलेला दिसला. अचानक धावत येऊन त्यावर नेने डान्स करू लागले. पुढे येऊन मी त्यांना विचारलं की, नेने लोकं tv वर येऊन नाचतात तो वेगळा, तुम्ही tv वर नाचताय ते वेगळं. हे म्हणजे पिळगावकरांनी घरात foreign gym चा video काढून discovery channel ला विकण्यासारखं झालं. तर नेने मला म्हणाले, आबा चिनचा बहिष्कार करतोय!!! अरे देवा त्यासाठी आपलाच tv फोडला? खरच धन्य आहेत. काय काय करतील त्याचा नेम नाही. आता डोळ्यात तेल घालून त्यांच्या मुलावर लक्ष ठेवावं लागणार. नाहीतर उद्या तो पडायचा चौथ्या माळ्यावरून. नाव त्याचं “सचिन” आहे ना!!!


शिऱ्याच्या डायरीत त्याचा त्रागा दिसून येईल.

१७ जून २०२०

भाजीच्या धंद्याचे बारा वाजले. मनोज आणि विकास यांनी मला दगा दिला. रोज सकाळी आळीपाळीने ऊठून wholesale भाजी आणायची असा प्लॅन होता. मी बरोबर ऊठलो. म्हणजे, मला आबांनी बरोबर ऊठवलं. पण हे आलेच नाहीत. झोपून राहीले. मी बसस्टाॅपवर वाट पाहात होतो. तिथेच मलाही डोळा लागला. बरोबर ९ वाजता जाग आली. तेव्हा हे समोर मला नुसते पाहात ऊभे दिसले. विचारलं केव्हा आलात? तासभरापूर्वी म्हणाले. मग ऊठवलं का नाही मला? म्हणाले ५ वेळा प्रयत्न केला. तू लाथ मारलीस!!! एकतर स्वत: वेळेवर आले नाहीत. त्यात माझी बदनामी करत होते. तिथेच निर्णय घेतला.. धंदा बंद!! मराठी लोकं यानेच पाठीमागे राहातात. आमच्यात सलोखा करण्याचा प्रयत्न शरद आजोबांनी केला. पण आता आमचे मतभेद टोकाला गेले होते. मनोज नको नको ते आरोप करू लागला. म्हणे माझी अवस्था शिऱ्याने काॅंग्रेस पक्षासारखी केली आहे. निर्णय प्रक्रीयेत मला विश्वासात घेत नाही. कसा घेणार? तो सतत फडणवीस काकांच्या घरी ये जा करतो. त्यांचा आमच्या धंद्यावर डोळा होता. काड्या घालण्याचे उद्योग सतत करत होते. संजयकाका या प्रकरणाने भलतेच चिडले. त्यांनी माझ्यासाठी किती स्वप्न पाहीली होती? मला म्हणायचे, शिऱ्या आज या गेटसमोर धंदा मांडलायस... एक दिवस मला तू दिल्लीच्या मार्केट मधे दिसायला हवास. मी दिल्लीत का जाणार? हे मलाच

कळलं नाही. पण त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली मनोज आणि विकासने! आता यापुढे त्यांचा “सामना” करताना हाल होणार त्यांचे. असो... मराठी पानिपतात हरले याला कारण भाऊबंदकीच!! अजूनही तेच तेच सुरू आहे याचंच

वाईट वाटतं.


शामलाची डायरी

१८ जून २०२०

ग्राहक पेठेत आता सगळं काही online होणार. त्यांचं मागणी पत्र आता online भरावं लागणार. सगळ्या आमच्या मंडळाच्या बायका आज गोंधळल्याच. कळेना काय करायचं ते. शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचं जे होतं तेच झालं आमचं. सुरेखा फारच घाबरते. शांतता म्हणून नाही जीवाला. तीच्याही आणि तीच्यामुळे आमच्याही. या coronavirus ने किती काय

बदल घडवले? चांगले आणि वाईटही. आज पमाचा फोन होता. राजीवचं लग्न पुन्हा मोडलं. ४० वर्षाचा राजू आमचा. कधी नव्हे ते लग्न ठरलं. मार्चच्या पहील्या आठवड्यात. लगेच मे मधे उरकून टाकू म्हणून तयारी केली. पण हा मेला coronavirus आला. Lockdown झालं. त्यात राजू आणि ती मनाली फोनवर संपर्कात होते. पण अचानक राजूची नोकरी गेली. ही बातमी कळताच मुलीकडच्यांनी निर्णय घेतला. लग्न मोडलं. असे किती लोकं या परीस्थीतून जात असतील, देव जाणे! राजूला म्हटलं होतं ते चांगल्यासाठी होतं. समजा लग्नानंतर नोकरी गेली असती तर? त्याला धीर दिला,आता बरा आहे! या दिवसात coronavirus negative हवा पण, जगण्यात positivity हवी.


शेखरची डायरी

१९ जून २०२०

शाळेत निबंधही चांगला न लिहीणारे आता या social media वर साहीत्यीक म्हणून मिरवतायत. प्रत्येक विषयावर स्वत:चं मत प्रदर्शीत करणं हे compulsion आहे का? जो उठतो तो सल्लाकेंद्र उघडतो. Coronavirus आला.. काय करायचं पासून देशाच्या आर्थिक परीस्थीतीवर लिखाण सुरू... वादळ आलं लगेच

लेखण्या सरसावल्या! त्या सुशांतसिंग आत्महत्येनंतर प्रत्येकजण depression विषयी लिहू लागला!! आणि आता चायना!!! अरे त्या चायनावर बहिष्कार टाका लिहीताना काही basic गोष्टींचातरी विचार करा. तुम्ही ज्या मोबाईलवरून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करत आहात त्याचे निम्म्यापेक्षा जास्त स्पेअर पार्ट चिनी बनावटीचे आहेत, किंवा तो संपूर्ण फोनच चिनी बनावटीचा आहे.

तुम्ही जे कॉम्प्युटर वापरताय त्याचे निम्मेअधिक स्पेअर पार्टस चिनी बनावटीचे आहेत.

यापासून आपल्या रोजच्या जगण्यातल्या कित्येक गोष्टी तिथूनच आयात केल्या जातात. आपण जात नाही चायनाला!!! त्यामुळे स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर दिला की, हळूहळू त्या चिनी वस्तूंची demand कमी होणार. पण हे सगळं हळू हळू होणार! एका रात्रीत नाही. त्यापेक्षा सरकारने आयात थांबवावी ना! ते होणार का? तुमचं दात ओठ खाऊन काय होणार आहे मग? त्या आठवलेंनी आणखी एक टुमणं काढलं. चायनीज पदार्थांच्या हाॅटेलवर बंदी आणायची. निषेध करायचा! तो व्यवसाय करणारे भारतीय आहेत हे ठाऊक आहे की नाही? देव जाणे!! आणि सध्या हाॅटेल्सही बंद आहेत याची आठवण करून द्या!! नाहीतर लोकं हाॅटेल बाहेर..गो फ्राईडराईस गो.. गो मंच्युरीयन गो.. ओरडताना दिसायची!!!!!!


शलाकाची डायरी

२० जून २०२०

या lockdown मधे शरीराकडे फारसं लक्ष देता आलं नाही. घरातली काम इतकी होती की, कधी आरशात स्वत:ला नीट पाहाताच आलं नाही. पण lockdown शिथील झाल तसं जाणवलं की, शरीराला पण शिथीलता आली आहे. पिंकीने सांगितलं की online app आहे. ३०मिनीटं, ४५ मिनीटं व्यायाम... ते समोर करतात तसा आपणही करायचा. फायदा नक्की होतो. ८ दिवसात पिंकीने दिड किलो वजन कमी केलं. मला त्यावर विश्वास नाही म्हणा! पण मग लगेच तो app download केला. आणि सुरू केला व्यायाम. हे सुरू असताना आबा तिथे आले. तेही माझ्यासोबत व्यायाम करू लागले. आता या वयात त्यांना झेपणार आहे का? २ वेळा धडपडले. माझाही व्यायाम त्यामुळे बोंबलला. आई म्हणाली, हे असलं नाचकाम करण्यापेक्षा आबांकडून योगा शिक. ते जास्त फायद्याचं आहे. मला आवडली आयडिया. पिंकीला सांगितलं तर म्हणाली, मलाही शिकायचय. श्वेता, पुजा पण तयार झाल्या. यावरून एक वेगळीच आयडिया माझ्या डोक्यात आली. आबांच्या योगाचा online course सुरू करायचा. माझं शिकणं पण होईल आणि पाॅकेट मनी सुध्दा मिळेल. आबा तयार झालेत. मला म्हणाले, शलाका यात मी sleeping partner होतो. तसही जास्तीत जास्त मी झोपलेलाच असतो. योगा शिकवण्यासाठी तेवढा जागा राहीन. सो... मी या क्लाससाठी नाव शोधतेय. सुचेल मला. उद्यापासून yoga online classes सुरू... योगायोगानेच गोष्टी घडतात हेच खरं!!!


केदार शिंदे

२१ जून २०२०

763 views

Recent Posts

See All