टिपरे returns episode 4


आबांची डायरी...

१० जून २०२०

या लाॅकडाऊन मधून थोडी शिथीलता मिळाली असं tv वर पाहीलं. पण मला काही हे घरचे घराबाहेर पडू देत नाही. काॅटवरून जरा उठलो तरी कोणी ना कोणी येऊन डाफरतो. हे त्यांचं काळजीयुक्त प्रेम आहे हे कळत मला. पण जरा म्हणून हलायचं नाही का? चुर्ण घेण्याचीही चोरी झालीय. सकाळी वांदे माझे होतात. यांना काय सांगणार? मलाही माझी काळजी आहेच. ८० वर्ष काय उन्हात केस पिकवले काय? या कोरोनाने एकदा मला दर्शन द्याव अशी रोज प्रार्थना करतो. असा बुकलून काढणार आहे ना त्याला! आम्हा म्हाताऱ्यांची गोचीच करून ठेवली आहे. ३ महिने झाले माझ्या ज्येष्ठ नागरीक मंडळींच तोंड पाहीलं नाही. Video call केला तर मास्क लावल्याने ओळखू येत नाहीत. परवा केरकर बोलत होते तर, मास्क मुळे त्यांचे शब्द तेच खात होते. त्यांना फोन ठेवताना म्हटलं की, आज जेवला नाहीत तरी हरकत नाही केरकर, शब्द संचय पोटात आहे तो झोप लावेल. पण आज आम्ही ठरवलय की या शनिवारी zoom वर एक मिटिंग करूया. सगळेच करतात. आजकाल त्याची फॅशन आली आहे. आपण कामात आहोत हे दाखवण्यासाठी तरी zoom वर लोकं जात असतात. केरकर त्याची तयारी करून निमंत्रण पाठवणार आहेत. त्यानिमित्ताने तरी सगळे दिसतील... जे दिसणार नाहीत ते गेले समजायचे.... गावी वगैरे.


शेखरची डायरी...

११ जून २०२०

ॲाफिसमधे २५% हजेरी हवी असं सांगितलय. पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? ते कोणीच सांगत नाही. रोज ९.१० ची लोकल पकडायची सवय होती. बसने ॲाफिसला जायचं म्हणजे आयुष्यातले ३ तास फक्त प्रवासातच घालवायचे. Work from home करू शकतोय पण, बाॅसला माझं तोंड पाहील्याशिवाय बरं वाटत नसावं! तक्रार न करता रोज जातोय

कामावर. चिडचिड होते. घरात अडीच महिने राहायची सवय लागली होती. किचन मीस करतोय.

पावसाचे चार थेंब काय पडले... असंख्य कवि आज Facebook वर उताणे पडले. लॅाकडाऊनच्या काळात जे कथा लिहीत होते ते पहील्या पावसावर कविता लिहायला लागले. स्वस्त झालय साहित्य!!! र ला ट जोडून कवितेच्या नावाने ही लोकं उद्या किराणा मालाचं बीलही खपवतील. त्यात लोकं न वाचताच लाईक देतात. कवि महाशयांना लाईकचा पाऊस पाहून वाटत की, जमलच आपल्याला!!! भरीस भर आता हे कवि स्वत: कविता सादरही करतात. आधीच कविता कठीण त्यात सादरीकरण म्हणजे, भीक नको पण कुत्र आवर!!!

आता पुढचे ३ महिने हे पावसाळ्यातले छत्रीवीर कवि सहन करावे लागणार...


शिऱ्याची डायरीचं पान त्याच्यातल्या महत्वाकांक्षी माणसाचं दर्शन घडवेल.

१२ जून २०२०

आम्ही सोसायटीतल्या मित्रमंडळींनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आम्ही व्यवसायात उडी मारायचं ठरवलं आहे. इथे व्यवसाय करणारे बरेच जण त्यांच्या मुळगावी गेल्याने, म्हणजे भैय्ये युपी बिहारला गेल्याने, आम्हा मराठी भावड्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे. किती वर्ष दुसऱ्याची चाकरी करायची? मालक होण्याचं भाग्य लाभत असताना आम्ही दुसऱ्यांचे keyboard किती वर्ष चालवायचे? हीच ती वेळ... असं म्हणत सेना आलीच ना सत्तेवर? मग हीच ती वेळ मानून आम्ही ठरवलय की आपण एक व्यवसाय सुरू करायचा!!! ताजी भाजी विकायची सोसायटी समोरच्या फुटपाथवर!

मी मनोज आणि विकास... तिघे मिळून हे करणार म्हटल्यावर आई टोमणे मारायला लागली. “शिऱ्या अरे त्या दोघांचं आणि तुझं पटत नव्हतं ना”? मी उत्तर दिलं की सोसायटीच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येतोय. दुकानाचं नावच आम्ही “महाविकास आघाडी” ठेवणार आहोत. महाराष्ट्रात जे चाललय त्याला तुमचा आक्षेप नाही तर, आम्हाला मोडता घालण्याचा तुम्हाला आधिकार नाही. येत्या १५ जूनला दुकानाचं भव्य उदघाटन शरद आजोबा जे पहील्या मजल्यावर राहातात ते करणार आहेत. खरतर आम्ही तरूणांनी असं काही करावं यात त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांच्यापर्यंत आम्हाला नेण्याचं काम तिसऱ्या मजल्यावरच्या संजय काकांनी केलं. आबा म्हणाले.... सगळच महाराष्ट्रातल्या राजकिय परीस्थीतीशी जुळतय शिऱ्या... पाचव्या मजल्यावरच्या फडणवीस काकांवर जरा लक्ष ठेवा.


शामलाची डायरी...

१२ जून २०२०

इस्त्रीवाल्याचा आज फोन आला. उद्यापासून येतो म्हणाला सोसायटीत. त्याच्याकडे गेल्या ३ महिन्यापासून कपडे तसेच आहेत. ते घेऊन येतोय. आता त्यांना पुन्हा धुवावं लागणार. त्याच्यावर coronavirus असला तर? काहीच

कळत नाही नेमका कसा आणि कुठे मेला हा coronavirus असेल! शिऱ्या लहानपणी असाच होता. खेळायला गेल्यावर समजायचच नाही नेमका कुठे असेल. गावभर शोधाशोध केल्यावर आबांच्या पलंगा खाली सापडायचा. हा coronavirus कितीही काळजी घेतली तरी असाच घरात सापडेल याची भीती वाटते. असो. आपण प्रत्येक गोष्ट सॅनीटाईज करून घ्यायची. पण मग मनाचं काय?? अशा खुप गोष्टी मनाच्या

कोपऱ्यात चिकटलेल्या असतात. त्यांना सॅनीटाईज कसं करायचं? त्या कुंटेंच्या घरातली बातमी आज coronavirus पेक्षा लवकर पसरली. गेले २ महिने कुंटे वहिनी हाल काढत होत्या. कधी कुणाला कळू दिलं नाही की, घरात नेमकं काय चाललय! घरगुती वादविवाद असायलाच हवेत. पण कुणी असं मारामारी पर्यंत येतं का? हे म्हणाले या domestic violence ला वेळीच आवर घालायला हवा होता. पण बाईची जात म्हणजे सगळं सहन करायचं. कुंटे वहिनी लाॅकडाऊन मधे खऱ्या अर्थाने लाॅक आणि अपमानाने डाऊन होत्या. उद्या coronavirus वरही उपाय निघेल... यावर कधी निघायचा???


शलाकाची डायरी आज अस्वस्थ करणारी वाटेल.

१४ जून २०२०

सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. आत्ता आत्ता आलेल्या त्याच्या chichore नावाच्या सिनेमात तोच आपल्या मुलाला आत्महत्या किती चुकिचा निर्णय आहे, याचे धडे देताना दिसला होता. या कलेच्या क्षेत्रात इतकं कसलं डिप्रेशन असतं? आणि मग ते असलं तरी उपाय काहीच नसतो का? अभिनयाचे क्लासेस मधे आता डिप्रेशनवर कशी मात करावी, याचंही प्रशिक्षण सुरू करायला हवं. एक मात्र खर की, कलेच्या आभासी क्षेत्रात प्रत्येकजण अभिनय करत असतो, पडद्यावर आणि पडद्यामागेही.

त्याच्या या बातमीची TRP वाली news केली या Newschannels वाल्यांनी. मढ्यावरचं लोणी कसं खायचं, हे news वाल्यांकडून शिकावं.

Entertainment क्षेत्रातल्या सगळ्या दिग्गजांनी लगेच tweeter,FB,Instagram वर पोस्ट टाकल्या. जेव्हा त्याला खरी गरज होती तेव्हा साधी एक लाईन लिहीली नाही, मेल्यावर श्रध्दांजलीची लाईन लावली. 😞


केदार शिंदे

१५ जून २०२०

569 views

Recent Posts

See All