टिपरे returns episode 3या तिसऱ्या episode चं लिखाण करण्याआधीच एक गोड बातमी मिळाली. १५ जून पासून संध्या ७.३०-८.३० Zee Marathi वर पुन्हा “श्रीयुत गंगाधर टिपरे “ मालिकेचं पुर्नप्रक्षेपण होणारं आहे. टिपरे returns या टायटल मधे एवढी जादू आहे? या आनंदाचा

तुम्ही tv वर आनंद घ्यालच. पण हे blog लेखन तुम्हाला आत्ताच्या टिपरे परीवाराच्या वातावरणाचा आनंद देत राहील. म्हणजे तसा माझा प्रयत्न राहील.


आबांची डायरी वाचकांना आज त्यांची काळजी लावून जाईल.

५ जून २०२०

काल पासून माझी तब्येत बरी नाही. थोडा घसा खवखवतोय. उगीचच ताप आल्यासारखं वाटतय. या कोरोनाने नको नको ते विचार येतायत. कालपासून मी घरात कुणाशीच बोलत नाहीए. अण्णांसारखं मौनव्रत नाही. पण सतत आपल्याला कोरोना झाल्याची भीती वाटतेय. संध्याकाळी शलाकाचं लक्ष गेलं. तीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं असावं. अभिनय कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्या अभिनेत्याला कळतच ना!! तीला विचारलं की, नक्की कोरोनाची लक्षणं काय? तीने मोबाईल वर सर्च करून मला वाचून दाखवलं. हे सगळ गुप्ततेनेच सुरू होतं. एकमेकांशी आम्ही हातवाऱ्यांनीच बोलत होतो. घरच्यांना वाटलं आम्ही dum sharad खेळतोय. आमच्या संभाषणात मधेच येऊन प्रत्येकजण नको त्या सिनेमांची नावही घेत होता. शेवटी शलाका म्हणाली की तुम्ही वाफ घ्या. तीनेच पाणी गरम करून आणलं. डोक्यावरून टाॅवेल टाकून मला वाफ दिली. मी स्वत:ला पाण्यात पाहायची ही पहीलीच वेळ होती. पण खुप आराम वाटला. शलाकाची आयडीया कामाला आली.

रात्री जेवणाच्या टेबलवर जो तो माझ्याकडे पाहून हसत होता. मला समजेना नेमकं झालय काय? मग कळलं की, डोक्यावर टाॅवेल घेतल्याच्या पोझचा फोटो शलाकाने मोबाईलवर काढला होता आणि तो पाहून थट्टा चालली होती. शेखर म्हणाला कोरोना वगैरे काही नाही. सगळ तुमच्या डोक्याचे खेळ आहेत. शामला म्हणाली की, आपण सगळी काळजी घेतोय ना मग? शिऱ्या म्हणाला, आबा कोरोना तुमच्या भेटीला येण्याआधी त्याला माझ्याशी सामना करावा लागेल.

असं प्रेम करणारा परीवार असल्यावर कोरोना पे क्या रोना??? शांत झोपलो.


शेखरच्या डायरीचं हे पान

६ जून २०२०

गेले २ महिने शामला आणि शलाकाचे हाल आज संपले. नवीन washing machine घेतलं. एकही पैसा न कमावता, पैसा खर्च करण्याची ही पहीलीच वेळ. घरात गरजेच्या सगळ्या गोष्टी होत्या. Washing machine ची फार गरज नव्हतीच कधी. घरात मावशी यायच्या कपडे,लादी,भांड्यांसाठी! पण या दोन महिन्यात आम्ही “आत्मनिर्भर” झालो. प्रत्येकाने काम वाटून घेतलं. कचरा शिऱ्या काढायचा. माॅपींग मी करायचो. भांडी कपडे शलाका शामला आलटून पालटून करायच्या. पण झेपायचं नाही त्यांना!!! सवय नाही राहीली! शलाका या कामांनी बारीक झाली. Gymचा खर्च करण्याची गरज नाही. रोज एवढ जरी काम केलं तरी वजन stable राहील. पण ऐकेल ती शलाका कसली?

शामला मला म्हणायची की, घरात सगळ्या वस्तू आहेत. एक washing machine राहीलच!! वटपोर्णिमेचं gift म्हणून तीला देऊन टाकलं. किती खुश झाली. मध्यमवर्गीयाचा आनंद हा किती limited असतो ना?

त्याचं connection करण्यासाठी प्लंबर काही मिळेना. आबा म्हणाले त्याला शोधण्यासाठी युपी बिहार पर्यंत जावं लागेल बहूदा! शेवटी शिऱ्याच्या मित्राने दिला. मराठी माणूस प्लंबींग क्षेत्रात पाहून गळा दाटून आला. त्याची जवळ जवळ प्रकट मुलाखतच आबांनी घेतली. तो पाण्याच्या connection चं काम करताना बोलत होता. आबा प्रश्न विचारता विचारता कधी त्याचे मदतनीस झाले? कळलच नाही. १६ नंबर पाना, पकड वगैरे शब्द लिलया बोलू लागले. काम आटोपताच आबांनी त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला. म्हणाले येत जा अधून मधून.

परीस्थीती बदलली आहे हे मात्र खरं. सगळ्याच बाबतीत आपण “आत्मनिर्भर” झालो तर जगात नाव कमावू! चिनला त्याची जागा दाखवून देऊ. महासत्ता होण्याची योग्यता आपल्यात आहेच. असे विचार डोक्यात येत असतानाच, आबा washing machine च्या मागून वर आले व म्हणाले... made in China लिहीलय. Ban China हे राजकिय पातळीवर केंद्राने जाहीर करायला हवं. आम्ही काही washing machine आणायला चायनाला गेलो नव्हतो.


शिऱ्याची डायरी आज थोडी चिडखोर वाटेल. पण इलाज नाही. तो त्रासलाय...

७ जून २०२०

अकला काय गहाण ठेवल्यात काय यांनी? २ महिने घरात अडकलो ना? त्रास भोगला ना? मग unlock 1.0 म्हणजे,रोहीत शेट्टीचा गोलमाल २-३-again सिनेमा आहे का एवढी गर्दी करायला? Social distancing हा फक्त बोलण्याचाच भाग राहीलाय. उद्या रूग्ण वाढले की हेच system विरूध्द गळे काढणार. आपल्या शिक्षण पध्दतीचाच घोळ आहे. ८० मार्क इतिहास भुगोल आणि २० मार्क नागरीक शास्त्र यानेच आपली माती केलीय. खरतर ८० मार्कांचं नागरीक शास्त्र असतं तर शाळेपासूनच शिस्त लागली असती.

Bank loan चे फोन पुन्हा सुरू होतील. काल पर्यंत गाडी,घर यासाठी विचारणा असायची... आता जगण्यासाठी,श्वास घेणासाठी loan सुरू होईल. श्रीमंत आणि गरीब यांना समान पातळीवर आणणारा हा कोरोना उस्ताद ठरला. सगळच normal होऊ लागलय म्हणजे आता IPL चा विषय पुन्हा जोर धरेल. त्यांच्यात social distancing कसं पाळणार? बाॅलर मास्क लावून बाॅलिंग करेल पण, बाॅलला थुंकी लावण्यासाठी मास्क सतत काढावा लागेल. बॅट्समॅनची विकेट गेल्यावर प्रत्येक फिल्डर आपआपल्या जागेवरूनच video call करून एकमेकांचं कौतुक करतील का? बॅट्समॅन २ असतात फिल्डवर. ते एकमेकांशी ओव्हर संपल्यावर बोलणारच नाहीत का? एकमेकांकडे पाहाणारच नाहीत का? अंपायर स्टंप जवळ उभे राहाणार तर त्यांना face shield देणार का? स्टेडियममधे सीट असणार की direct बेडट

टाकणार?? आणि tvवर live telecasts मधे फक्त मास्क, साबण, sanitizers याच product’s च्या जाहीराती असणार का?


शलाकाची डायरी अस्वस्थ करणारी आहे. कारणही तसच आहे.

८ जून २०२०

घराबाहेर पडायचं नाही. Tv वर repeat telecast मधेच मालिका लागतायत. “हवा येऊ द्या” याचं नाव बदलून तरी “पुन्हा पुन्हा हवा येऊ द्या” ठेवायचं ना? भाऊ कदमचे सगळे डायलाॅग आता पाठ झाले. बुडत्याला काठीचा आधार म्हणून OTT platform म्हणायला हवा. हिंदी Web series बघून मी नव्या मनोरंजनाची तहान ताकावर भागवते आहे. पण त्यात माझा वेगळाच

Problem आहे. नवं काही पाहायचं म्हटलं की आबा शेजारी येऊन बसतात. त्यात web seriesला सेन्साॅरचं काही बंधन नसल्याने जरा काही hot scene सुरू झाल्यावर awkward व्हायला होतं. काल तर मी scene लागल्यावर awkward झाले पण, आबा थोडे पुढे सरसावले. अचानक त्यांचा चष्मा काढून, “बघू तरी हा चष्मा लावून कसं वाटतं”? म्हणून वेळ मारून नेली. आबा सतत चौकशी करत होते की, पुढे ती दोघं मुलं रूम मधे गेल्यावर त्यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली? मी स्टोरी बदलून सांगितली! पण हे हिंदी web series वाले असे काय? भले जमाना modern झालाय पण काही गोष्टी सांभाळाव्या लागतातच ना? Web series म्हणून सतत शिव्या आणि सेक्स या गोष्टी compulsory आहेत का? साधं सुधं निर्मळ काही नसतच का?


शामलाच्या डायरी मधे आज नवऱ्याविषयीचं प्रेम ओतप्रोत भरलेलं होतं.

९ जून २०२०

यांना माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी!!! मला जे जे हवं होतं ते ते दिलं. Washing machine सुध्दा न सांगता आणली. या वटपोर्णिमेला सुखद भेट मिळाली. आणि काय हवं असतं एका स्त्रीला? आजकाल आमच्या घरात कपडे कोण धुणार? यावरून वाद होतात. प्रत्येकाला washing machine चं कौतुक वाटतय. घरात एक नवा मेंबर आल्याने वातावरणात लगेच फरक पडतो ना? आबा सकाळी उठल्यापासून स्वत:चे धुण्याचे कपडे घेऊन machine जवळ उभे राहातात. यातच आज आणखी एक घटना घडली. आमच्या शांता मावशी आज कामावर आल्या. घरात washing machine आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसला होता, यांचा चेहेरा मात्र उतरला. आपल्या हातून कपडे धुण्याचं काम जाणार, पर्यायाने पगार कमी होणार असं त्यांच्या मनात आलं असावं. मी समजूत काढली. पगार तेवढाच राहील. Machine कडे एक सहाय्यक म्हणून पाहा म्हटलं. इतकी वर्ष इमाने काम करणाऱ्या या लोकांना कसं तोडायचं? असं आज जेवताना सांगितल्यावर सगळे कौतुकाने पाहात होते. शलाकाच्या तर डोळ्यात पाणी आलं , मला मिठ्ठीच मारली तीने! म्हणाली तुझ्यासारखा विचार करण्याची बुध्दी देव मला देवो!!

संसार काटकसरीने करावा.. कुणाला कट करून करू नये.. इतकं साधं गणित आहे.


केदार शिंदे

१०.०६.२०२०

1,344 views