टिपरे returns episode 2Episode 1 च्या response ने मी आणि टिपरे परीवार भारावून गेल्याच्या अवस्थेत असतानाच हा Episode 2 लिहायला घेतला. डायरी कुणाची वाचू नये म्हणतात. पण टिपरे कुणी दुसरे नाहीतच. ते आपलेच आहेत. त्यामुळे तुम्ही वाचा बिनदास्त आणि इतरांनाही सांगा वाचायला! मालिके इतकीच लोकप्रियता या episodes ना सुध्दा मिळायलाच हवी. टिपरे deserves......


शेखरच्या डायरीचं हे पान.

२ जून २०२०

या lockdown मधे तारीख वार काही समजतच नाही. रोजचा दिनक्रम सारखाच. सकाळी उठा, मॉपिंग करा. दुपारची भांडी घासा... संध्याकाळी repeat telecast मधे त्याच देवादिकांच्या मालिका पाहा. शामला त्याच त्याच गोष्टी पाहून कंटाळत कशी नाही? असं विचारलं तर म्हणाली, इतकी वर्ष तुम्हाला पाहातेय, येतोय का कंटाळा. आणि आला तरी सांगायचा कुणाला?

शेजारचा विभाकर त्याच्या मुलाच्या परीक्षा प्रकरणाने धास्तावलाय. त्याला व मुलाला समजतच नाहीए की परीक्षा होणार की नाही. सरकार म्हणतय रद्द,तर राज्यपाल म्हणतायत होणार. मुलगा पुस्तकाची उघड झाप करून करून दमलाय. विभाकरला आज धीर दिला. म्हटलं, पोरग हूशार आहे काळजी नको. तर विभाकर मला म्हणाला, “शेखर अरे असली कोश्यारी काय कामाची?” बोलताना हूशारी ला कोश्यारी म्हटल्याचही त्याच्या लक्षात आलं नाही.

केरळच्या त्या हत्तीणीच्या हत्येची बातमी त्रासदायक! पोटूशी होती. असं कसं कुणी वागू शकतं? निषेध. पण आपल्याही आजूबाजूला असे नराधम आहेतच. म्हाताऱ्या कोताऱ्यांचा विचार न करता दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करणारी जनावरं अनेक दिसतात.

कोरोनाच्या टेन्शन मधेच,उद्या निसर्ग वादळ येणार असं समजलय. त्यापूर्वीची शांतता निर्माण करण्यासाठी आणि जनतेला धीर देण्यासाठी आता Facebook वर मुख्यमंत्री live येणार आहेत. त्यांना पण काय काय सांभाळावं लागतय?


आबांच्या डायरीचं पान....

३ जून २०२०

देवा या वयात सगळ दाखवलस रे. स्वातंत्र्यपूर्व काळा पासून ते अगदी lockdown काळापर्यंत सगळच. त्यात आज वादळही पाहीलं. नुकसान होता होता वाचलं. पण तिथे कोकणात फारच तांडव केला तू देवा!! या News channel च्या वादळापासून मात्र या जन्मात आपल्याला कुणी वाचवणार नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. कोरोनाच्या बातम्या अचानक बंद? कोरोना काळात सतत हात धुवायचे असतात. हे सगळे वादळाच्या मागे हात धूवून लागलेले दिसले. काय ती reporter ची नाटकं? वारा दिसत नाही हे मान्य पण, तुमचा टुकार अभिनय दिसतो ना! Background music थरकाप उडवणारं. बातम्या या जीव वाचवणाऱ्या असाव्यात. त्या जीवघेण्या करण्याची रेस लागलेली असते प्रत्येक news channel मधे.

पण वारा सुटला होता हा! मी हॉलमधून किचनमधे त्याच्या forceनेच पोहोचलो. माझा मास्क अचानक गायब झाला. मला वाटलं की वाऱ्यामुळे खिडकीबाहेर गेला असणार. मग समजलं की,आमच्या शिऱ्याने लपवून ठेवला होता. मास्क मिळाला नसता तर मी लोकांना तोंड कसं दाखवणार होतो? देवालाच ठाऊक!


शिऱ्याच्या डायरीच्या पानाचा अवतार पाहाण्यासारखा असतो. अक्षर अगदीच कोंबडीचे पाय कागदावर फिरल्यासारखे. विचारल तर म्हणतो की, डॉक्टर होण्याचे गुण अक्षरात होते फक्त, परीक्षेचे गुण कमी पडले

४ जून २०२०

काल दिवसभर घराच्या बाहेर पडलोच नाही. तसाही २ महिने कुठे गेलोय म्हणा! पण बोलायची एक पध्दत असते म्हणून म्हटलं! सॉलिड वादळ होतं. पण संकट टळलं. काही का असेना, गेले २ महिने जो कोरोना कोरोना जप सुरू होता तो काही काळ तरी थांबला होता. लोकं विसरूनच गेली की,आपण २ महिने घरातच आहोत. मला हे कोरोना प्रकरण म्हणजे जागतिक झोल वाटतो. बघा आता, आपल्याकडे वादळाने काही काळ चर्चा थांबवली तर तिथे अमेरीकेत तर लोक बिनदास्त आंदोलनासाठी घराबाहेर पडतायत. त्यांच्या clips पाहाताना अस वाटतय की, कोरोना? कोण? कुठे झालाय? आम्हाला तर ट्रंप झालाय. आणि त्याच्यावरची लस काही केल्या मिळत नाहीए.

For a change आज बातम्यात सांगितलं की, फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना पत्र लिहीलं. पत्राची कॉपी पाहायला मिळाली नाही. नाहीतर चुकून राज्यपालांना लिहीलेलं पत्र “मातोश्रीवर” पोहोचायचं आणि पुन्हा टिकेची “वर्षा” त्यांच्यावर व्हायची. Social media वर फडणवीस साहेब म्हणे टिकाकारांना block करतात. काल शेजारचा सुशांत block झाला. त्याने फक्त forwarded WhatsApp जोक post केला होता. तोच, वटपोर्णिमेला फणस २० ला दिला.


शलाकाची डायरी म्हणजे.... फक्त काही शब्द आणि प्रश्नचिन्ह...

५ जून २०२०

Social distancing.........सिनेमात हिरो हिरॉईनला जवळ घेतल्यावर कसं सांभाळणार? पुर्वीच्या सिनेमात दाखवायचे तशी २ फुलं जवळ येऊन थरथरणार का? Sanitizer हे वेगवेगळ्या सुगंधांमधे कधी येणार? म्हणजे perfumes चा खर्च वाचेल ना! मास्क designs मधे येतायत त्याने बरं वाटलं. आईला म्हटल, आपण त्यावर खर्च करू,तसाही lipsticks चा खर्च आता कुठे होणार आहे?


शामलाची डायरी ही फारच लपवून ठेवलेली असते. जागा दर वेळी ती बदलत असते. आज एकदम थंड होती... फ्रिजमधून नुकतीच बाहेर काढली होती.

६ जून २०२०

ग्राहक संघटनेतून निरोप आला, यावेळी वाणसामान ते पाठवू शकणार नाहीत. त्यांच्याकडे म्हणे मजूरच नाहीत, सामान ने आण करण्यासाठी. आता शलाका सोबत त्या departmental storeमधे जावून सामान आणावं लागणार. महाग पडतं. त्यात तीच्यासोबत जायचे म्हणजे तीच्या आवडीच्या आणखी १० गोष्टी घेऊन यायच्या. चार आण्याची कोबंडी आणि ७५ रूपयाचा मसाला. तोही चायनीज नाहीतर थाय! नाक्यावरचे किराणा दुकानवाले बेस्ट होते. माफक दरात हवं तेच सामान मिळायचं. त्यात वहीत लिहून ठेवायचे. महिनाभर पैसा हाती खेळता राहायचा! आताचे हे store म्हणजे आपल्या पिशव्या वस्तू चोरू नये म्हणून बाहेर सील करणार आणि बील भरताना आपल्या पाकीटावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणार.

वटपोर्णिमेची पुजा काल केली. बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे यांनी कागदावर वडाच्या झाडाचं चित्र काढून दिलं. त्यालाच हळद कुंकु वाहीलं. दोरा बांधता येणार नाही कळताच आबांनी आयडीया दिली. पेन्सीलने झाडाभोवती रेषा मार म्हणाले. सात जन्म नवरा हवा म्हणून या प्रथा ज्यांनी कुणी सुरू केल्या असतील, त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की ही वेळ कधीतरी येईल. नागपंचमीला कागदावरच्या नागाला दूध कसं पाजायचं? याचा विचार करत आबा आज झोपी गेले.केदार शिंदे

०७.०६.२०२०

2,974 views

Recent Posts

See All