टिपरे returns episode 1दिलीप प्रभावळकरांनी लिहीलेल्या ‘अनुदिनी’ या पुस्तकाची पुढे “श्रीयुत गंगाधर टिपरे” ही मालिका सादर करण्याची संधी मला मिळाली. आठवड्यातून एक भाग, म्हणजे महिनेयातून चार भाग. लोकप्रिय मालिकांचा इतिहास काढला तर,टिपरे सर्वोत्तम मालिकांच्या गणनेत वरच्या क्रमांकावर नक्कीच असेल. आजही लोकं विचारतात की मालिका का बंद केली? दिलिपभाई म्हणाले होते, मालिका कधी बंद करताय? असं विचारण्याची वेळ येऊ द्यायची नाही. या lockdown मधेही लोकं you tube वर त्याचे भाग पाहून आपलं मनोरंजन करून घेतायत. नविन सीझन तरी आणा! म्हणून सुचना करतायत.

पण ते शक्य नाही. कारण, चमत्कार एकदाच घडतो.

तरीही स्वत:चा blog सुरू करताना, या टिपरे परीवारासोबत वेळ घालवावासा वाटला. २०२० वर्ष कसं जात असेल त्यांचं? आबा,शेखर,शामला,शिऱ्या,शलाका ह्या व्यक्तिरेखा तुमच्या पसंतीच्या आणि ओळखीच्या आहेत. डायरी लिहीण्याची सवय अजूनही त्यांना असेलच ना! दिलिपभाई(प्रभावळकर) यांना साष्टांग नमस्कार करून, ही टिपरेंच्या डायरीची काही पान!!


शेखरच्या डायरीत एवढं काय लिहीलेलं असतं? ठावूक नाही. त्याची डायरी कायम भरलेली असते. वर्षाचा सहावा महिना सुरू झाला असला तरी डायरी ९ महिन्याची pregnant दिसते.

१ जून २०२०

आज शामलाला कांदा भजी आणि बटाटेवडे करण्यात मदत केली. खरतर माझा आणि किचनचा संबंध एवढा दृढ होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. उद्या परवा कधी lockdown संपल्यावर ऑफिसात गेलो तर, inward outward फाईलची गफलत होईल मात्र, गरममसाला संडेमसाला मोहरी जीरं यांचे डबे कुठे आहेत? याची गफलत शक्य नाही. माझ्या किचन मधल्या लुडबूडीने शामला थोडी वैतागते. तीचं म्हणणं आहे की मी अगदीच पवारांसारखा वागतो. महाविकास आघाडीने काम करायचं म्हटल्यावर ते लागलीच Facebook live जाऊन त्यांची हवाच काढून टाकतात. तसच काहीस. राजकारणातलं शामलाला हळूहळू कळायला लागलय तेही lockdown मुळेच!!!


आाबांची डायरी खुप मुद्देसूद. त्यांना फाफटपसारा आवडत नाही.

१ जून २०२०

कोरोनाने नेमके किती लोकं हैराण आहेत? ते ठाऊक नाही. पण या newschannel च्या माऱ्याने मात्र खुप हैराण व्हायला होतय. प्रत्येक बातमी घाबरण्यासाठीच तयार करतात का? कधीतरी वाटतं बातम्यांच्या background music नेच माझा जीव जाईल. या news channel वाल्यांनाच सरकार quarantine का करत नाही? भरीसभर त्या वृत्तनिवेदिका! यांचं मराठी एवढ वाईट कसं हो? आमच्यावेळी दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका म्हणजे डोळे आणि कान, दोघांनाही सुखाची पर्वणी. आता म्हणजे दुष्काळच! त्यांना म्हणावं मास्क लावून तरी बातम्या द्या. त्या निमित्ताने शब्द गाळून ऐकू येतील आणि दिसणही थोडं adjust होईल.


शामलाची डायरी रात्री लिहीली जाते. सगळ्या कामातून उसंत मिळाल्यावरच!

१ जून २०२०

सोसायटीचा पाववाला येण हे इतकं चर्चेचं होऊ शकत? मान्य मला की, या दिवसात सोसायटी मधे येणारा माणूस हा आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थीत असावा. पण त्याची खबरदारी घेण्यासाठी वॉचमन आहेना? खरतर पाववाला हा मुस्लिम असल्यानेच काहींचा विरोध आहे. Gossip मला मागच्या दाराने समजलं. WhatsApp group वर कुणी तसं बोललं नाही पण, अंदाज येतोय त्याला विरोध करणाऱ्या मंडळींवरून! Lockdown मधे आता शिथीलता आणण्याचा प्रयत्न चाललाय ना? मग करू देना प्रत्येकाला व्यवसाय. जातपात काय पाहायची? काल रात्री उध्दवसाहेब tv वर आले तर किती बरं वाटलं? त्यांनी माहीती दिली ती अगदी कान लावून ऐकली. ते tv वर आले की मला माझ्या भावाची आठवण येते. Lockdown मधे त्याची भेट नाही. Network घोळामुळे video call नाही. उध्दवसाहेबांमधेच मी त्या पाहून घेते. कधीतरी वाटतं..... ते अचानक बोलतील.... शामलाताई काळजी घे गं!


शलाकाची डायरी ही फार कमी शब्दांची. तीच्या अडचणी खुप वेगळ्या आहेत.

१ जून २०२०

Mall कधी उघडणार? Gym तरी सुरू करा. मी shopping कधी करणार? किमान beauty parlour तरी उघडा ना! मिशा वाढल्या आहेत!!


शिऱ्या आजकाल work from home करतोय. त्यामुळे दिवसभर शर्ट टाय आणि खाली threeforth घालूनच फिरतो. त्याची डायरी लिहायची इच्छा नसते पण, सगळे लिहीतात म्हणून हा लिहीतो.

१ जून २०२०

हा ट्रंप काय डोक्यावर पडलाय का? अमेरीकेचं नेमकं काय करायचं ठरवलय त्याने? अशाने फक्त आय झेड होणार! ( मला खरतर वेगळ लिहायचं होत पण कुणी डायरी वाचली तर शॉक बसायचा) या पुढे मला अमेरीकेला जावसं वाटणं बंद होणार. त्याने नुकसान माझं नाही,अमेरीकेचं जास्त आहे.

आज net वर वाचलं कुठेतरी की मुंबईच्या दिशेने वादळ येतय. आपुनको पुरा भरोसा है की, मुंबईका कोई बाल भी बाका नही कर सकता. लालबागचा राजा, सिध्दीविनायक, मुंबादेवी, हाजीआली..... full protection आहे मुंबईला!!!

त्यात मलबार हिलवर ‘राज्यपाल’ पण आहेतच.

कोरोनाने जाम हैराण केलय. मास्क लावल्यावर घाम येतो. ते म्हणतात नाकातोंडाला हात लावू नका. जाम वळवळ तर तिथेच होते. त्यादिवशी चहा double गाळून प्यालो. आईने किचन मधून गाळून आणला होतो तेव्हा मी मास्क लावूनच प्यालो. लक्षात राहात नाही. नशीब झोपताना मी मास्क काढतो, नाहीतर सकाळी उठल्यावर दातही मास्क लावूनच घासले असते.


केदार शिंदे

०५.०६.२०२०

4,594 views

Recent Posts

See All